बैलगाडा शर्यत : पट प्रेमींसाठी आनंदाची बातमी….बैलगाडा शर्यतीस सुप्रीम कोर्टाची परवानगी
दिल्ली, ( 18 मे ) : प्राणी प्रेमी संघटना कडून बैलगाडा शर्यत बंद करून मुक्या प्राण्यांचा छळ थांबविण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज ( 18 मे ) सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला असून बैलगाडा शर्यतीस सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने बैल हा पळणारा प्राणी असून त्याला पळविण्यासाठी धारदार शस्त्राने बैलाला ढोसण्याची गरज नाही, असे म्हणणे सुप्रीम कोर्टात मांडले. शिवाय बैलगाडा शर्यत आयोजित करतांना कोणत्या अटीचे, कायद्याचे पालन करावे लागेल, याबाबत सुधारित कायदा केला होता. या कायद्याची समीक्षा करतांना महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन नवीन कायद्याबाबत समाधान व्यक्त करीत बैलगाडा शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आता देशभर बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. ग्रामीण भागातील अर्थकारण बैलगाडा शर्यतीवर अवलंबून आहे. बैल कशासाठी सांभाळावा, याचेही शेतकऱ्यांना सबळ कारण भेटले आहे. बैलगाडा शर्यतीसोबतच यात्रांचेही ग्रामीण भागात आयोजन केले जाते. यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम होतात. थोडक्यात बैलगाडा शर्यत व ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमीमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आता कोणत्याही अडथळ्याशिवाय बैलगाडा शर्यत आयोजित करणे आयोजकांना शक्य झाले आहे.
( news source & image : zee news marathi )