मोठी बातमी ! शरद पवारांनी अखेर राजीनामा घेतला मागे; अध्यक्षपदाची कमान पुन्हा हाती
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून राजीनाम्याचा निर्णय मागे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी आणि जनभावनांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.
शरद पवार यांनी आज सायंकाळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाची माहिती देताना पवार पुढे म्हणाले, लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी पक्षाचे सोडण्याचे जाहीर केले होते. 66 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.
मात्र, माझ्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उमटल्या. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझे सांगाती असणारी जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. मी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती सगळ्यांनी केली. देशभरातूनही अनेक नेत्यांचे फोन आले. त्यांनीही मला पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. लोकांच्या या भावनांचा अनादर माझ्याकडून होऊ शकत नाही. या सगळ्यांमुळे मी भारावून गेलो. आज सकाळी झालेल्या निवड समितीच्या बैठकीतील निर्णय या सगळ्यांचा विचार करून निर्णयाचा मान राखत मी माझा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारत असल्याचे जाहीर करतो, असे पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला होता. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे, असा ठरावही या बैठकीत घेण्यात आला होता.