जीवनात एक तरी कला असू द्या – प्राचार्य राजकुमार हिवारे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
■◆ जिल्हास्तरीय कला उसत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; १७४ विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट प्रदर्शन
चंद्रपूर, (दि. 28): – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कला उसत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ५१ शाळांमधून आलेल्या १७४ विद्यार्थ्यांनी ६ कला प्रकारांमधील स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कला उसत्व स्पर्धेमध्ये नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपारिक गोष्ट वाचन, गायन, वादन इत्यादी विविध कलाप्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेने आणि कलात्मक कौशल्याने उपस्थितांची मन जिंकली. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, जिल्हा परिषद, चंद्रपूर च्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक) श्रीमती निखीता ठाकरे, उपशिक्षणाधिकारी(प्राथमिक) विशाल देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य राजकुमार हिवारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आवश्यकता आणि महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्र हे शैक्षणिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. जीवनात एक तरी कला असू द्या” असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. जि.प. चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती निखिता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन त्त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.
या स्पर्धांमध्ये गायनात LMB Public School, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. वादनात लोकमान्य टिळक ज्युनियर कॉलेज, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. नृत्य या कला प्रकारात शिवाजी हायस्कूल, राजूरा येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. समूह नृत्य आणि समूह नाट्य कला प्रकारात ग्रामगीता कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर येथील चमूने प्रथम क्रमांक पटकाविला.
नाट्य प्रकारात जनता कन्या व कनिष्ठ महाविद्यालय, नागभीड येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. दृश्य कला या कला प्रकारात जनता ज्युनियर कॉलेज, चंद्रपूर येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. पारंपारिक गोष्ट वाचन या प्रकारात श्रीमती पन्नाबाई आश्रम शाळा, दमपुर मोहोदा, जिवती येथील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या सर्व स्पर्धकांची निवड राज्यावर आपली कला सादर करण्यासाठी झालेली आहे.
कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक क्षेत्रातील आवड अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सपना पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विषय सहाय्यक, साधनव्यक्ती, डाइटचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.