शिक्षक घनश्याम देवचंद (जी. डी.) पटले यांना मिळाला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार.
■◆ श्री तुकाराम हायस्कूल भोसा येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी केले अभिनंदन...
गोंदिया, (दि.06): महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार (माध्यमिक गट) गोंदिया जिल्ह्यातील श्री तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसा (तालुका आमगाव) येथील उपक्रमशील माध्यमिक शिक्षक घनश्याम देवचंद पटले यांना देण्यात आला.
समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने संबोधले जातात.
२०२३-२४ च्या पुरस्कारासाठी श्री तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथील वरिष्ठ व उपक्रमशील शिक्षक घनश्याम देवचंद पटले यांना दिनांक ०५ सप्टेंबर २४ ला शिक्षक दिनी मुंबई येथील टाटा नाट्य सभागृहात देण्यात आला.
पुरस्कार वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय सचिव कुंदन मॅडम, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
घनश्याम पटले यांनी शंभर प्रकारच्या रोगांविषयी माहिती देणारी आरोग्य वाचनालय पुस्तिका,मुख्याध्यापकांचे वार्षिक नियोजन, शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी शब्दकोडे यांचे संकलन पुस्तिका, शाळेत हजेरी उपक्रम, एक विद्यार्थी एक गीत, बोधकथा, मराठी माध्यमिक शिक्षकांचे मार्गदर्शन, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार असे अनेक उपक्रम राबवतात. यापूर्वी त्यांनी सर्व शिक्षा अभियानात विषयतज्ञ म्हणून पाच वर्षे कार्य केले असून विद्यार्थी, शिक्षक गुणवत्तेकरिता BRC गोरेगाव येथे भरीव असे कार्य केले आहे.
घनश्याम पटले यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांत, शिक्षक वर्गात, शैक्षणिक क्षेत्रात, समाजात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम (IAS), डायट चे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी(प्राथ.) सुधीर महामुनी, अधिव्याख्याता पूनम घुले, गटशिक्षणाधिकारी राजकुमार रामटेके, केंद्रप्रमुख निशा बोदले, शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. बिसेन, सर्व शिक्षकवृंद, विस्तार अधिकारी राजेंद्र येटरे, जे डी. मेश्राम, BRC गट समन्वयक सुनील बोपचे, साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे सह जिल्ह्यातील सर्व साधनव्यक्ती यांनी अभिनंदन केले आहे.