‘डी फार्म’ झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावे लागेल ‘DPEE’ परीक्षा; नंतरच मिळणार फार्मासिस्ट म्हणून मान्यता…
◆● केंद्र शासनाने काढले राजपत्र; परीक्षा फी पाहून लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात....
सर्व परीक्षार्थींना द्यावे लागेल 5900 रु. परीक्षा फी; गरीब विद्यार्थी कुठून आणणार एव्हढे पैसे…
नागपूर, (दि. 4 सप्टेंबर): डी फार्म (Diploma in Pharmacy) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन (DPEE) ही परीक्षा लागू केल्याने लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
भारत सरकारने याबाबत राजपत्र काढून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागेल असा फतवा काढलेला आहे. या राजपत्राच्या आधारे राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, न्यू दिल्ली (आयुर्विज्ञान) या संस्थेने अधिसूचना काढून विद्यार्थ्यांना दि. 13 सप्टेंबर पर्यंत परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यास कळविले आहे. परंतु या DPEE परीक्षेची परीक्षा फी ही भरमसाठ (5900/- रु.) असल्याने लाखो विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे त्यामुळे विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
देशात कोणत्याही डिप्लोमा कोर्सेससाठी अशी एक्झिट एक्झाम घेतली जात नाही, परंतु डी फार्म या डिप्लोमा कोर्ससाठी फक्त शासनाने ही परीक्षा का आणली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात ही विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार आहेत पण ही भरमसाठ परीक्षा फी पाहून गरीब विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. एकीकडे राज्य शासन लाडकी बहिण योजना राबवून बहिणींना 1500 रु. महिन्याला देत आहे तर दुसरीकडे केंद्र/राज्य शासन लाडक्या बहिणींच्या मुलांकडून 5900 रु. परीक्षा फी वसूल करत आहे. ही विसंगती दूर करण्यात यावी अन्यथा राज्यभर विद्यार्थी आंदोलन करणार अशी भूमिका 2024 ला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. वेळ पडल्यास हे विद्यार्थी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले जाते आहे.
“आम्ही DPEE परीक्षा देण्यास तयार आहोत, पण शासनाने ही जी भरमसाठ फी आकारली आहे तो आमच्यावर अन्याय आहे, शासन एकीकडे लोकांना सवलती देत असून दुसऱ्या बाजूने आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे. जवळजवळ 6000 रु. इतकी फी आम्ही कुठून आणावी, UPSC, MPSC, NEET, JEE यासारख्या परीक्षेची देखील इतकी फीस राहत नाही, मग डी फार्म झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच इतकी जास्त फी का म्हणून? या अन्यायाबद्दल आम्ही आंदोलन करू व न्यायालयात देखील दाद मागू….”
— एक विद्यार्थी
“कोणतीही परीक्षा ही गुणवत्तेसाठी घेतली जाते, यावर्षीपासून शासनाने डी फार्म उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी DPEE ही एक्झिट एक्झाम लागू केली आहे तसे शासनाचे राजपत्र व अधिसूचना जारी केली आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा अनिवार्य केली आहे त्यानंतरच या विद्यार्थ्यांना अधिकृत नोंदणी चे प्रमाणपत्र मिळणार आहे, निश्चितच शासनाने घोषित केलेली परीक्षा फी ही खूप जास्त आहे, ही कमी करावी व त्यामध्येही सामाजिक घटकानुसार SC, ST, OBC, EWS विद्यार्थ्यांना सवलत द्यावी असे वाटते, यावर शासनाने विचार करावा….”
– एक प्राचार्य,
फार्मसी कॉलेज,