शरद ढगे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; शिक्षकदिनी मुंबईत सत्कार
वर्धा, (दि. 3): जिह्यातील प्राथमिक शिक्षक शरद ढगे यांना २०२२-२३ चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. हिंगणघाट तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा सास्ती चे शिक्षक शरद गोपाळराव ढगे यांन शिक्षकदिनी पाच सप्टेंबर रोजी मुंबईत या पुस्काराचे मा. मुख्यमंत्री यांच्य हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 1961-62 पासून क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा रोख दहा हजाराचे बक्षीस, शिल्ड देवून गौरव करण्यात येतो. 2022-23 चा स्थगित व 2023-24च्या पुरस्काराची सोमवारी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्रातील 19, दिव्यांग 1 आदी इतर मिळून 109 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये जिह्यातील हिंगणघाट तालुक्यातील जि.प. शाळा, सास्ती चे शिक्षक शरद ढगे यांचा समावेश आहे.
पुस्कार प्राप्त शिक्षक शरद ढगे यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेला आनंददायी व अर्थपूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सक्षम केले तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कोडींगचे धडे दिले. त्यातूनच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या डिजिटल गेम स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्याने राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये शरद ढगे यांची सास्ती शाळा तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकाची ठरली होती. शरद ढगे हे एनसीईआरटी, एस सी ई आर टी तसेच विविध स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडत असतात.
शरद ढगे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.