संदीप तिडके यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
■◆ 5 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार मुंबई येथे सत्कार
गोंदिया, (दि. 3): महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत देवरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली येथील उपक्रमशील व कार्यतत्पर मुख्याध्यापक संदीप तिडके यांची राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मागील 19 वर्षापासून संदीप तिडके शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आपल्या अध्यापनाच्या वैविध्यपूर्ण शैलीमुळे व मुख्याध्यापक पदावर राहून कौशल्यपूर्ण प्रशासनाची चुनूक दाखवीत ज्या- ज्या शाळेत त्यांनी काम केले त्या प्रत्येक शाळांना त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या पटलावर आणण्याचे काम केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्या अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसदोडका ही त्यांची पहिली शाळा त्या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी लोकसहभागातून अनेक कामे केली विद्यार्थी पट 150 वरून 200 पर्यंत नेण्याचे काम केले. सोबतच सामाजिक भान ठेवून लोक सहभागातून भव्यदिव्य अशा हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करीत नवीन मंदिराची निर्मिती करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
आंतरजिल्हा बदलीने सावली येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात सावली शाळेला मागील दहा वर्षात अनेक विविध क्षेत्रांमधील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत गावची शाळा आमची शाळा उपक्रमात तालुकास्तरीय पाच पुरस्कार व जिल्हास्तरीय दोन पुरस्कार शाळेला प्राप्त करून दिले, विज्ञान प्रदर्शनी सातत्याने मागील दहा वर्षात तीन वेळा पुरस्कार शाळेला प्राप्त झाला आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात नागपूर विभागात दुसरा क्रमांक शाळेला प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/ रा येथे कार्यरत असताना शाळेला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त करून दिला सोबतच अनेक विकासात्मक कामे सुद्धा लोकसहभागातून पळसगाव/रा येथे केलेली आहेत. त्यांच्याच नेतृत्वात 15 ऑगस्ट रोजी नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम केल्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव राका या शाळेला 2022 मध्ये तर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते यावर्षी सन्मानित करण्यात आले. लोकसहभागातून अनेक कामे संदीप तिडके यांचे नेतृत्वात करण्यात आलेली आहेत.
2019 मध्ये सावली येथे संपन्न झालेल्या जिल्हा क्रीडा महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन सुद्धा संदीप तिडके यांच्या नेतृत्वात करण्यात आले संघटन व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संदीप तिडके यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवीत असंख्य सामाजिक कामे त्यांनी केलेली आहेत आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांकरता त्यांचे योगदान अतुलनीय असून सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्ती म्हणून संपूर्ण परिसरात त्यांची ख्याती आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारांबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत असून आप्तेष्ट, मित्रपरिवार, शिक्षक बंधू- भगिनी, पत्रकार महोदय , संघटना पदाधिकारी, अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.