विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरीत करा
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी महामुनी यांना निवेदन
गोंदिया (२८ आगस्ट ):- विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरीत करा या मागणी सह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया च्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात सुधीर महामुनी शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. गोंदिया यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सत्र सुरू झाल्यानंतर अजूनही शालेय गणवेश मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश लवकरच वितरीत करण्यात येईल, असे आश्वासन साहेबांनी संघटनेला दिले.
केंद्र प्रमुख पदोन्नती करण्यात यावी, जिल्हा परिषदेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, इयत्ता 6 वी ते 8 वी साठी रिक्त असलेली भाषा, गणित, सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, शिक्षकांचे निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्या संदर्भाने कार्यवाही करावी, 1नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात,अधिसूचना निघालेल्या व त्या नंतर शासकीय सेवेत लागलेल्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना मूळची 1982 – 1984 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भाने कार्यवाही करावी, शाळेला आवश्यक असलेल्या वर्ग खोल्या देण्यात याव्या, आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, किशोर डोंगरवार, अजय शहारे, नितीन अंबादे, आशिष वंजारी, आशिष रंगारी, प्रकाश बंसोड, दीक्षांत धारगावे, रितेश मेश्राम, सतीश टेंभेकर रोशन गजभिये, अमित गडपायले, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.