जि. प. कवडी शाळेत पालक सभा संपन्न: शाळेला गुणवत्ता पूर्ण घडवण्याचा संकल्प…..
■◆पं. स. उपसभापती, सरपंच, पोलीस पाटील, केंद्रप्रमुख यांचेसह मोठ्या संख्येत पालकवर्ग होता उपस्थित.
आमगाव, (दि.20): तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कवडी (केंद्र- अंजोरा ) येथे या सत्रातील पहिली पालक सभा शनिवारला संपन्न झाली. विद्यार्थी, शिक्षक, पालक या तिघांमध्ये परस्परांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी व मुलांच्या शैक्षणिक विकासात पालकांची काय भूमिका असावी याकरिता शाळेच्या वतीने पालक सभेचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमराजजी कटरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला पंचायत समितीचे उपसभापती नोहरलालजी चौधरी, सरपंच योगेश्वरी ताई पटले, पोलीस पाटील विलास साखरे, केंद्रप्रमुख एम. एम .राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वांच्या प्रमुख मार्गदर्शनात ही सभा घेण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ब्राह्मणकर यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे सहसंबंध कसे असले पाहिजे या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. उपसभापती नोरलालजी चौधरी यांनी पालक सभेत शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी पालकांनी सलोख्याचे संबंध ठेवणे हे महत्त्वाचे आहे, शिक्षक हे गुरु आहेत. विद्यार्थ्यांनी दररोज एक तास घरी अभ्यास करावा, पालकांनी विशेषतः आईने त्याच्यासोबत बसून अभ्यास घ्यावा असे पालकांना आवाहन केले. तर सरपंच श्रीमती योगेश्रीताई पटले यांनी सर्वात प्रथम नव्याने शाळेत आलेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षकांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत अशी अपेक्षा केली व माझ्या ग्रामपंचायत तर्फे ज्या काही भौतिक सुविधा देता येतील ते देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन कमलानंद रहागंडाले यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश बघेले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जाधव यांनी अथक परिश्रम घेतले तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालक सभा यशस्वी झाली.