अवघ्या 12 वर्षाची मुलगी झाली इंग्रजी पुस्तकाची लेखिका
♦ सान्वी जीवनकर या मुलीने लिहिले ” दी मॅजिकल सीक्रेट ” हे काल्पनिक कथांवर आधारित पुस्तक
वयाच्या 12 व्या वर्षी एखादं पुस्तक नावावर असणे,तेही अस्खलित इंग्रजीत हे खरंतर आव्हानात्मक. त्यातही काल्पनिक कथानक इंग्रजीत मांडणे, त्यासाठी दर्जेदार सकस लेखन करणे आणि तेवढाच ताकदीची प्रकाशन संस्था भेटणे हेही आजच्या डिजिटल युगात कठीण.मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वास असला की आव्हाने लीलया पार करता येतात आणि मग आपल्या पदरी यश हमखास नोंदविले जाते.आमच्या कुटुंबातील सांन्वी दिनेश जीवनकर हिने हे यश पदरी पाडून आम्हा सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. ” दी मॅजिकल सीक्रेट “हे काल्पनिक कथांवर आधारित पुस्तक लिहून सान्वी आज जागतिक स्तरावर पोहचली
आहे.त्यामुळं तिच्या दैदिप्यमान कामगिरीची दखल घ्यावीच लागेल.
सान्वी दिनेश जीवनकर.वय-12 वर्ष,नयुरोन लॅब स्कूल, धानोरी पुणे या शाळेची इयत्ता 8 वीची विद्यार्थी. लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. इंग्रजी साहित्य आणि त्यातील कथा,कादंबरी वाचून ती प्रगल्भ झाली. इंग्रजी कथा वाचताना तिला स्वतः मध्ये लिहिण्याची आवड निर्माण झाली. वाचतावाचता ती त्यातील आवडणारी वाक्ये नोंद करू लागली. त्यातून तिच्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. आपणही लिहू शकतो असा आशावाद बळावत गेला आणि ती सहज लिहू लागली. साहित्य या तिच्या आईवडील यांचा प्रांत नाही. मात्र आईवडिलांनी तिच्यातील लेखनाचे गुण हेरले आणि तिला वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके उपलब्ध होऊ लागली. अशातच ती चांगली लिहू लागली. वडिलांनी ते वाचले आणि त्यांना धक्का बसला. आपली मुलगी इंग्रजीत इतकं सुंदर लिहु शकते याबद्दल ते अनभिज्ञ होते.वाचून त्यांनी ते दिल्ली एका प्रकाशन संस्थेशी संपर्क साधला.एव्हीन्सपब प्रकाशन संस्थेच्या प्रकाशकाने ते वाचले. त्यातील मथिथार्थ, अर्थ,वाचकांना आकृष्ठ करण्याची दर्जेदार भाषा, विषयाची निवड, मांडणी सार काही आवडलं आणि त्यांनी थेट पुस्तक प्रकाशित करण्यास तयारी दर्शविली. अवघे 30 पानांचं हे पुस्तक 5 मे 2024 ला संपूर्ण जगात प्रकाशित करण्यात आले. अवघ्या 12 वर्षाच्या मुलीचं इंग्रजीत प्रकाशित झालेलं हे पुस्तक आज ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, bspscart,evincepub यांच्या लिंकवर उपलब्ध झाले आहे.30 पानांचं हे पुस्तक 400 रुपये किमतीच असल्याने त्याचा दर्जा किती मोठा असेल याची कल्पना करा.
या पुस्तकात लेखिकेने शाळेला सुट्या लागल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या उत्सुकतेत असलेल्या अमेरिकेतील झाराह पंडित या मुलीची काल्पनिक कथा मांडली आहे. झाराह मधील आव्हानात्मक स्वभाव तिने यात वर्णन केला आहे. अवघ्या सातव्या वर्ष ती भारत सोडून अमेरिकेत जाते. तेथील वातावरणात ती समरस होते. तिला तीन मित्र भेटतात. तिघी मिळून साहसी काहीतरी करण्याचं धाडस करतात. त्यात आणखी काही तरी वेगळं करण्याची संधी शोधत असतात. झाराह ही धाडसी आणि जिद्दी मुलगी असून ती कोणत्याही परिस्थितीत हार मानण्यास तयार नसते.ती आपल्या मित्रांमध्ये जिद्द निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि ती यात यशस्वी होते. आपण मित्र सोबत असलो की कितीही आव्हान आले तरी ते लीलया पार करायचे असते हे ती त्यांना पटवून देते. मित्र सोबत असले की टीम वर्क व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सारे घटक कसे एकत्र काम करतात हे या पुस्तकात पटवून देण्यात आले आहेत. अतिशय सुरेख मांडणी आणि दर्जेदार लेखन व त्याला सुंदर चित्रांची जोड देत हे पुस्तक अतिशय दर्जेदार झालं आहे.लहान मुलांना अतिशय उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहून सांन्वीने आपणही उत्तम लेखिका होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे.
लहान मुलांसाठी मोठे लेखक कथाकथन करतात, मात्र आपल्याच समवयस्क मित्रांसाठी काल्पनिक कथा इंग्रजीत लिहिणारी सांन्वी मात्र असामान्य ठरली आहे. महाराष्ट्रीयन मराठी कुटुंबातील एक मुलगी एवढे धाडस करू शकली कारण त्यामागे तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. आईवडील मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा(घुघुस)येथील रहिवासी. वडील दिनेश ईश्वर जीवनकर(माझे सोयरे, पत्नीचे भाऊ) हे पुण्यात राहतात.ते अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीत मोठया पदावर कार्यरत असुन आई ममता कवाडे-जीवनकर ही पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत आहे.कुठलीही इंग्रजी पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी मुलीला अस्खलित इंग्रजीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणे खरंच अभिनंदनीय आहे.त्यांच्या सहकार्यानेच सांन्वी एका पुस्तकाची लेखिका म्हणून आज जागतिक स्तरावर पोहचली आहे.
बेटा तुझे अभिनंदन.आम्हा सर्व कुटुंबियांना तुझा अभिमान वाटतो आहे.आजी-आजोबा सत्यशीला ईश्वर जीवनकर, दोन्ही आत्या शीतल अरविंद खोब्रागडे, सिम्पल मनीष तामगडे या सर्वांना आता तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अर्थात तुझ्यातील जिद्द आणि चिकाटी या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहेत. भविष्यात आणखी दर्जेदार लेखन करून वाचकांची अभिरुची सांभाळशील यात शंका नाही. तुला उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मोठी लेखिका बनण्याचे सारे गुण तुझ्यात असून तुला जागतिक स्तरावर कीर्ती मिळो, हीच सदिच्छा.