महाराष्ट्र

वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – सिनेअभिनेत्री रविना टंडन

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न

Ø जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन

चंद्रपूर, दि.०२- वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि जंगलातील गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे साकार होऊ शकले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व वन्यजीव सद्भावना दूत रविना टंडन यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदि मान्यवरांची उपस्थिती होती .

या प्रसंगी बोलताना रविना टंडन अक्षरशः भावूक झाल्या. ‘माझं ताडोबाशी फार जवळचं आणि भावनिक असं नातं आहे. मी अनेकदा इथे येते. ताडोबाच्या जंगलातील वाघ आणि त्यांचे परिवार ओळखता यावेत इतकी भटकंती मी ताडोबात केली आहे. ताडोबा हे प्रेमाचं जंगल आहे. इथे आलं की माणूस या जंगलाच्या मोहात पडतो,’ अशा भावना व्यक्त करतानाच, पर्यावरण, जंगल आणि वाघांच्या संवर्धनासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

 

आपल्या भाषणात रविना टंडन यांनी वनसंवर्धनाचं काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांपासून तर जिप्सी चालक, गाईड आणि गावकरी सर्वांना श्रेय बहाल करत, असंच काम करत राहण्याचं आवाहन केलं. एखाद्या वाघिणीने पिलाला जन्म दिल्याची बातमी जशी आनंद देऊन जाते, तसेच एखाद्या वाघाच्या मृत्यूची घटना तेवढीच वेदनादायी असते. पण एक मात्र खरं आहे की ताडोबाच्या जंगलाची जादू जगात कुठेही बघायला मिळत नाही. म्हणूनच या टायगर कॅपिटलची महती मी जगाला सांगणार आहे. जगाच्या पाठीवर जिथे जाईल तिथे ताडोबाचा झेंडा फडकावणार असल्याची ग्वाही देखील रविना टंडन यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??