अस्तित्व-अस्मिता रक्षणानेच आदिवासींचे सशक्तीकरण शक्य – डॉ. विनायक तुमराम
♦ राजुरा येथे ‘आदिवासींचे अस्तित्व व अस्मिता’ विषयावर चिंतन
चंद्रपूर ( 29 फेब्रुवारी ) : आदिवासींच्या अस्तित्वासोबतच त्यांच्या अस्मितेचाही ज्वलंत प्रश्न आज निर्माण झाला आहे. आदिवासींच्या अस्मितेचे आधारवड असलेले धर्म, भाषा आणि संस्कृती हे महत्त्वाचे घटक आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे घटक शाबूत ठेवणे ही आपणा सर्वांचीच गरज आहे. आदिवासींच्या सशक्तीकरणाचे बीजही त्यात दडले आहे. एकमेकांवर कुरघोडी करीत बसण्यापेक्षा आदिवासींच्या सशक्तीकरणाला पोषक वातावरण निर्मितीसाठी आदिवासी प्रतिभावंतानी, राज्यकर्त्यांनी, लोकसेवकांनी, अभ्यासक ,संशोधकांनी आपली बौद्धिक ऊर्जा गुंतवावी, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांनी व्यक्त केले.
राजुरा येथे रविवारी दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चौथ्या उलगुलानवेध चिंतन बैठकीत ते बोलत होते. अ. भा. क्रां. नारायणसिंह उईके संघर्ष समिती चंद्रपूर शाखेद्वारा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या चिंतन बैठकीचे उद्घाटन ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी केले. सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक राजेश मडावी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, वासुदेव शेडमाके, डॉ. गजानन लोहवे, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. मृदुला रायपुरे-जांगडेकर, प्रा. प्रदीप हिरापुरे, स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल आत्राम व मंचावर जि. प. सहायक वित्त व लेखा अधिकारी धर्मराव पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष राजेश मडावी यांनी आदिवासींचा इतिहास, साहित्य, संस्कृती, वर्तमानातील सामाजिक व राजकीय प्रश्नांवर भाष्य करून भविष्याच्या दिशा स्पष्ट केल्या. समितीचे केंद्रीय सचिव सुनील कुमरे यांनी आयोजनाची भूमिका मांडली. आचार्य पदवीप्राप्त रूपा घोनमोडे यांचा मान्यवरांनी सत्कार केला. संघर्ष समितीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी उत्तम गेडाम व चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संतोष आत्राम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. प्रा. महेश गेडाम यांनी आभार मानले. आयोजनासाठी राजेंद्र कुळमेथे, नरेश उईके, लक्ष्मी उईके, संगीता आत्राम, अक्षय तुमराम, सुनील मडावी आदींनी सहकार्य केले.
आदिवासींच्या मुक्तीचे शस्त्र म्हणजे आदिवासी साहित्य – डॉ.वि.स.जोग
आज आदिवासी साहित्य आदिवासी प्रतिभावंतांच्या लेखणीतून उत्कटतेने प्रगटत आहेत आणि आदिवासी समूहांना एक नवीन चेतना देण्यास ते सरसावले आहेत. परंतु दुर्दैवाने मराठीच्या सारस्वतांनी या साहित्याची हवी तशी दखल घेतली नाही. आदिवासी कवींचे काव्यसंग्रह आणि त्यातील कविता मी वाचल्या आहेत त्यातून आदिवासी कवींच्या कवितेची झेप मला प्रकर्षाने जाणवली. आदिवासी प्रतिभावंतांचे हे साहित्य आदिवासींच्या मुक्तीचा जाहीरनामाच असल्याचे मी मानतो. आज अनेक समस्यांनी व्याप्त आदिवासी समाज पुढारलेल्यांच्या चिंता आणि चिंतनाचा विषय होणे गरजेचे आहे. सत्य काय आहे हे समजून त्याचा स्वीकार आणि पुरस्कार करणे गरजेचे आहे, असे मत समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी व्यक्त केले.