जिल्ह्यातील 45 विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी बंगलोरला रवाना…
◆● शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी दिल्या शुभेच्छा..
गोंदिया, (दि.27): राष्ट्रीय आविष्कार अभियान उपक्रमांतर्गत Exposure Visit Outside State करिता जिल्ह्यातील शासकीय/ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इयत्ता 6 वी ते 11 वी मधील 45 विद्यार्थ्यांना पाच शिक्षकांसह कर्नाटक राज्यातील बंगलोर व मैसूर येथे अभ्यास दौऱ्यावर दि. 27 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत पाठविण्यात आले आहे. आज सर्व विद्यार्थ्यांशी जिल्हा परिषद गोंदिया च्या आवारात डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी संवाद साधून सुखरूप प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जाते. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील 3 ते 5 विद्यार्थी निवडले जातात. यावर्षी अर्जुनी/मोर तालुक्यातील (5 )विद्यार्थी, आमगाव (5), देवरी (6), गोंदिया (8), गोंरेगाव (5), सडक अर्जुनी(4), सालेकसा(6), तिरोडा(6) असे एकूण 45 विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात सहभागी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषद समग्र शिक्षा चे भूषण रहमत्कर, गट साधन केंद्र सालेकसाचे साधनव्यक्ती भाऊलाल चौधरी, गट साधन केंद्र गोंदियाचे गट समन्वयक विनोद परतेके, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोटीचे शिक्षक मंगेश बोरकर, जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडीच्या शिक्षिका कु. श्रुती पालेकर या देखील विद्यार्थ्यांसोबत अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, शिक्षणाधिकारी माध्यमिक कादर शेख, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, ज्ञानेश्वर दिघोरे, समग्र शिक्षा चे सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी सुखद प्रवासाकरिता हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.