भिसी वनविभागाची अवैध रेती तस्करावर कार्यवाही ; ट्रॅक्टर चालकासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल
♦ रेतीसहीत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त
भिसी, ( 13 जानेवारी ) : वन विभाग भिसी अंतर्गत गडपिपरी बिटातील राखीव वन कक्ष क्रमांक 30 मधील नवेगाव ब्राह्मण येथील जंगलात 13 जानेवारीला रात्री सव्वाबारा वाजता अवैध रेती तस्करी करतांना भिसी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकास अवैध रेतीसह पकडले. ट्रॅक्टर व ट्रॉली रेतीसहीत जप्त करून ट्रॅक्टर चालक व अन्य तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार, नवेगांव ब्राह्मण राखीव वन कक्षामध्ये वनाधिकारी व कर्मचारी गस्तीवर असतांना त्यांना एका ट्रॅक्टरचा आवाज आला.आवाजाच्या दिशेने वनाधिकारी गेले असता एक ट्रॅक्टर दिसला. तो थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसहीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने ट्रॅक्टर पकडला.तपासणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती भरलेली दिसली. ट्रॅक्टरवर नंबरसुद्धा नव्हता.चालकास विचारणा केली असता तो ट्रॅक्टर अमोल गोहणे या व्यक्तीचा असल्याचे चालकाने सांगितले.शिवाय ट्रॅक्टरमधील रेती जंगलातून आणल्याचे कबूल केले. त्यावरून वनाधिकारी संतोष औतकर यांनी आरोपी जितेंद्र निळकंठ तुरारे ( भिसी ) व इतर तीन आरोपीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून रेतीने भरलेले निळ्या रंगाचे ट्रैक्टर व ट्रॉली ( क्र. एम एच. – 34, एल.- 7951 ) एक ब्रास रेतीसहीत जप्त केले.
ही कार्यवाही भिसी वन परीक्षेत्र अधिकारी संतोष औतफर, वनरक्षक भानुदास बोरकर, कर्मचारी जॉनी नंदनवार, प्रकाश पाटील, जितेंद्र दडमल यांनी केली.