Breaking…विष प्राशन करणाऱ्या भिसी येथील तरुण, कर्जबाजारी शेतकऱ्याचा नागपूर येथे उपचारदरम्यान मृत्यू
♦आठ दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अखेर संपली ; लाखो रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्त्या?
भिसी, ( 2 जानेवारी ) : चिमूर तालुक्यातील भट्टी चौक, भिसी येथील रहिवाशी वसंता विजय लोहकरे ( 35 ) यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता कपर्ला टी-पॉईंटपासून जवळ असलेल्या स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबातील लोकांना कळताच गंभीर अवस्थेत असलेल्या वसंता लोहकरे यांना कुटुंबियांनी पहिल्यांदा उमरेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे 27 डिसेंबरला त्यांना नागपूर मेडिकल कॉलेज येथे भरती करण्यात आले. आठ दिवस वसंता लोहकरे यांची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर 2 जानेवारीला पहाटे चार वाजता संपली.
प्राप्त माहितीनुसार, वसंता लोहकरे यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे थकीत कर्ज आहे. धनश्री बँकेचे सहा लक्ष रुपयांचे कर्ज आहे.याशिवाय खासगी लोकांकडून घेतलेले अंदाजे 15 लक्ष रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या तणावातून वसंताने आत्महत्त्या केली असावी, अशी चर्चा भिसी गावात सुरु आहे.
वसंताकडे दोन ट्रॅक्टर असून घरच्या दोन एकर शेतीसाठी तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील कामांसाठी वसंता भाड्याने ट्रॅक्टर देत होते.ते घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती होते.त्यांच्या मागे पत्नी, म्हातारे आई – वडील, 11वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, विवाहित बहीन असा परिवार आहे.