देश विदेश

माझे मत : घर घर राष्ट्रध्वज – तिरंगा ; घर घर संविधान अभियानाची सुरुवात

♦ इ.झेड. खोब्रागडे ( भाप्रसे, नि.) संविधान फौंडेशन, नागपूर यांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विशेष लेख

 

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘ घर घर तिरंगा ‘ हा उपक्रम देशभर होत आहे. केंद्र सरकारने यासाठी आदेश दिले आहेत. देशाचा राष्ट्रध्वज ही संविधानाची निर्मिती असून राष्ट्रध्वज देशाचे प्रतीक व शान आहे. अभिनंदनीय असा उपक्रम आहे.

 

राष्ट्रध्वजात सर्वात वर केसरी , मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असून मध्यभागी पांढरा रंगात , निळ्या रंगात अशोक चक्र दिले आहे. चार रंग असलेला हा राष्ट्रध्वज देशाच्या संविधानातील प्रास्ताविकेतील वैश्विक मूल्यांची सतत आठवण करून देते. त्यामुळे, घर घर राष्ट्रध्वज – तिरंगा हे अभियान खूप महत्वाचे आहे. नागरिकांना , शाळा महाविद्यालयातील मुलामुलींना, शिक्षक – प्राध्यापकांना, कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना, सर्व स्तरातील लोकप्रतिनिधीना राष्ट्रध्वजाचे महत्व समजावून सांगण्याची गरज आहे. त्यादृष्टीने, हे अभियान फार महत्वाचे ठरते.

 

15 ऑगस्ट 2023 ला हे अभियान संपेल, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षही संपेल. मात्र ,दरवर्षी 15 ऑगस्ट तर होणारच आहे. घर घर तिरंगा हे अभियान मागील वर्ष 2022 पासून सुरू झाले आणि इव्हेंट म्हणून का असेना परंतु शासन प्रशासनाने हे अभियान यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न केले. राष्ट्रध्वज संविधान सभेची देण आहे. तेव्हा, संविधान निर्मितीचा संदर्भ देऊन राष्ट्रध्वजाबाबात, स्वातंत्र्याबाबत , आझादी का अमृत महोत्सव या अभियानावर आधारित परीक्षा शासनाने घ्यावी व प्रथम येणाऱ्यांना सन्मानित करावे. नागरिक, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, कार्यालय, लोकप्रतिनिधी असे गट करून प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परिक्षा घेतली तर अभियानाचे मूल्यमापन होऊ शकेल.या अभियानाने काय दिले, फलित काय ह्यासाठी मूल्यमापनाची कोणती तरी पद्धत वापरली पाहिजे. सोपी पद्धत परीक्षा, objective , online ही घेता येईल. सरकारने विचार करावा.

 

दुसरा मुद्धा जो आम्ही यापूर्वी अनेकदा मांडला आहे, तो हा की 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिवसाला वर्ष 2024 मध्ये75 वर्ष होत आहेत. तसेच, 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिवसाला 2025 मध्ये 75 वर्ष होत आहेत. हे दोन्ही दिवस संविधानाची निर्मिती आहे. हे दोन्ही दिवस सरकारचे वतीने देशभर साजरे केले जात आहेत. तेव्हा , हे दोन्ही दिवस मिळून, ‘संविधान का अमृत महोत्सव’ म्हणून 26 नोव्हेंबर 2023 पासून साजरे करायला सुरुवात केली पाहिजे.वर्ष 2023 ते 2025 या काळात घर घर संविधान हे अभियान व त्यापुढेही संविधान जागृतीसाठी अभियान सुरू ठेवावे. याबाबत भारत सरकारने आदेश जारी करण्याची गरज आहे. आम्ही ,संविधान फौंडेशन चे वतीने प्रधानमंत्री यांना 11 ऑक्टोबर 2022 ला निवेदन पाठविले आहे. काही केंद्रीय मंत्री, कॅबिनेट सचिव, सचिव, लोकप्रतिनिधी खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, मुख्यसचिव यांनाही पाठविले आहे. यासंदर्भात ,आम्ही एक पत्रक सुद्धा प्रसिद्ध केले आहे. समाजमाध्यमात पोस्ट केले आहे.कृपया वाचावे.

 

येत्या 26 नोव्हेंबर ला ‘ वॉक फॉर संविधान’ देशभर, सर्व स्तरावर, गावापासून, राजधानी पर्यंत, आयोजित करून, ‘ संविधान का अमृत महोत्सव ‘ ची सुरुवात करावी. घर घर संविधान आणि संविधान समजण्यासाठी संविधानाच्या मूलभूत ढाच्यावर Basic Structure, Salient Features वर सोप्या व मनोरंजनात्मक भाषेत संविधान साहित्य निर्माण करून विक्रीसाठी उपलब्ध करावे. संविधान साहित्य संमेलन/परिषद/ महोत्सव/ व्याख्यानमाला/, परिसंवाद/निबंध-स्लोगन स्पर्धा/सांस्कृतिक कार्यक्रम /संविधान सभा आयोजित करून लोकांमध्ये संविधान मूल्य रुजविण्याचे विविध उपक्रम राबविले पाहिजे. देशाचे संविधान आहे 140 कोटी नागरिकांचे. नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता सुख समृद्धी देणारे, राष्ट्राच्या अखंडतेचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचे हे संविधान , देशाची लोकशाही व देशाचे स्वातंत्र्य मजबूत करणारे आहे. नागरिकांचे हक्क व अधिकारांचे संरक्षण करणारे , प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार देणारे आहे.

 

आम्ही, भारताचे लोक, हक्क व कर्तव्ये बाबत उदासीन राहून कसे चालेल? सरकारला सांगा, आपल्या भागातील लोकप्रतिनिधी ना सांगा, प्रशासनाला सांगा, मीडियाला सांगा. सरकार करीत नसेल तर नागरिक म्हणून आपण करा, जे करतात त्यांना साथ द्या. अभियानात सहभागी व्हा. संविधानाच्या योग्य अंमलबजावणीसाठी आग्रही रहा. सत्य बोला, शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोला. देशसेवा घडेल. आम्ही भारताच्या लोकांनी आमच्यासाठी स्वतःप्रत संविधान सभेत दि 26 नोव्हेंबर1949 ला हे संविधान अर्पण केले आहे. लोकांचे लोककल्याणकारी राज्य 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाले. देश प्रजासत्ताक झाला. उत्सव, महोत्सव साजरा करायचा तो संविधानाची मूल्यव्यवस्था मजबुत करण्यासाठी. मूलभत अधिकारांचे रक्षण, देशाच्या स्वातंत्र्यचे रक्षण व देश हित तेव्हाच साधले जाईल जेव्हा मूलभूत कर्तव्य, जे संविधानात 51- A मध्ये दिले आहेत , ते प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावले तर. संविधानानिक कर्तव्य व जबाबदारी पार पाडू या, देश घडवू या.सत्यमेव जयते.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??